देवतांची चित्रे असलेल्या फटाक्यांवर कारवाईची मागणी
सकल हिंदू समाज कन्हान क्षेत्राचे कन्हान पोलिसांना निवेदन
तारसा चौकातील दुकानावर पोलिसांची कारवाई ; मुद्देमाल जप्त
कन्हान : - दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर देवतांची चित्रे असलेल्या फटाक्यांची विक्री होत असल्याचे समोर आल्यानंतर सकल हिंदू समाज कन्हान क्षेत्रातील तरुणांनी पोलिसांकडे निवेदन देऊन कारवाईची मागणी केली .
अलीकडे नागपूर मधील महल परिसरातील चांडक फटाका भंडार या दुकानात देवी-देवतांची चित्रे असलेले फटाके विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे उघड झाले होते . या प्रकारामुळे हिंदू धर्माचा अवमान झाल्याची भावना व्यक्त होत असून नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे .
कन्हान व कांद्री परिसरात अनेक फटाक्यांची दुकाने सुरु आहेत. अशा दुकानांत देव-देवतांचे किंवा महापुरुषांचे फोटो असलेले फटाके आढळल्यास संबंधितांवर गुन्हा नोंदवून मुद्देमाल जप्त करावा , अशी मागणी तरुणांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत पाटणकर यांना निवेदन देऊन केली . या प्रसंगी सकल हिंदू समाज कन्हान क्षेत्राचे अध्यक्ष शुभम बावनकर , लोकेश दमाहे , विनोद यादव भैया , अनिकेत निमजे , ऋषभ बावनकर , आयुष संतापे , अजय पाली , अमन गुप्ता , हितेश राजपूत , उदय माहोरे , हर्षल कोसरे , वंश कावळे , जीवन नांदुरकर , यश महालगावे , आकाश गुप्ता आदि उपस्थित होते .
जागृती मोहीम राबवून दुकानदारांना आवाहन
निवेदनानंतर सकल हिंदू समाजाच्या युवकांनी परिसरात जागृत अभियान राबवले . फटाक्यांच्या दुकानांना भेट देऊन देवतांची चित्रे असलेले फटाके विक्रीस न ठेवण्याचे आवाहन त्यांनी दुकानदारांना केले .
तक्रारीनंतर पोलिसांची तात्काळ कारवाई
अभियाना दरम्यान तारसा चौकातील एका फटाक्याच्या दुकानात देवतांची चित्रे असलेले फटाके विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे आढळले . माहिती मिळताच पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत पाटणकर , आकाश सिरसाट व आतिश मानवटकर यांनी दुकानाची पाहणी करून मुद्देमाल जप्त केला . या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात आली असून भविष्यात अशा प्रकरणांवर कठोर पावले उचलण्यात येतील, असे आश्वासन पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांनी दिले आहे .
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर



0 टिप्पण्या